मिरज : सोनी (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी गावाजवळील शेतात मिलिंद तुकाराम वाघमारे उर्फ बब्बर (वय ५५) या शेतमजुराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका महिलेस चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बब्बर जनावरे खरेदी - विक्री व शेतमजुरी करीत होते. सोमवारी सकाळी व्यंकोबा मंदिराजवळ शेतात वाघमारे यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस फाैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वाघमारे यांच्या अंगावर जखमांच्या व इतर काहीही खुणा नसल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यांच्या अंगात बनियन व विजारीच्या खिशात लैंगिक उत्तेजक गोळ्या सापडल्या. उत्तेजक औषधे घेतल्याने वाघमारे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा संशय आहे. वाघमारे यांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. संबंधित महिलेस शेतात घेऊन गेल्यानंतर तेथे झटका येऊन आकस्मिक मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मिरज शासकीय रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाघमारे यांच्याशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध सुरू केला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फाेटाे : १८ मिलिंद वाघमारे