दरम्यान, कोरोना नियंत्रणात अंगणवाडी सेविका कार्यरत असतानाही त्यांच्याकडून या आहाराचे बालक, स्तनदा माता व गरोदर मातांना आहार साहित्याचे किट दिले जात आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कच्चे धान्य व किराणा मालाचे पॅकिंग केलेले किट देण्यात येते. यात चवळी, मूगडाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर, आदी साहित्य दिले जाते. यात गेल्यावर्षी खाद्यतेलाचा समावेश होतो. आता त्याला फाटा देत साखरेचा समावेश करण्यात आला आहे. खाद्यतेलाच्या भडकलेल्या किमतीमुळेही असा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. तरीही लाभार्थ्यांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे.
चौकट
पूरक आहारात काय काय मिळते
१) शासनाकडून सहा महिने ते ३ वर्षे वयोगट, गरोदर माता व स्तनदा माता, ६ महिने ते ६ वर्षे वयोगट व ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांना आहार दिला जातो.
२) या आहारात चवळी/चना, मूगडाळ/ मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ आणि साखरेचा समावेश आहे.
३) पाककृतीमधील धान्याचा प्रकार, प्रतिदिन लाभार्थ्याला द्यावयाचे प्रमाण, त्यातील उष्मांक आणि प्रथिने यांचा विचार करून हा आहार देण्यात येतो.
कोट
राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना कालावधीत शिजविलेला आहार देता येत नसल्याने बालक व मातांना या आहाराची पॅकिंग दिली जात आहेत. आहारातील उष्मांक व प्रथिनांचा विचार करूनच आहारात वरिष्ठ पातळीवरून बदल करण्यात आला आहे.
शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण)
चौकट
पूरक पोषण आहार योजना
एकूण लाभार्थी १९४८७१
सहा महिने ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थी १६६०५९
गरोदर महिला लाभार्थी १३६९९
स्तनदा माता १५११३
चौकट
कोरोना कालावधीतही काम
शहरासह ग्रामीण भागातही कोरोना नियंत्रणासाठी आशा वर्कर्ससह अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रत्यक्ष सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर सर्व सेवा देण्यातही त्यांचा सहभाग आहे. जिल्हा प्रशासनानेही आपले नियमित काम पूर्ण करण्यासह कोरोना कामकाज असतानाही त्यांच्याकडून उद्दिष्टपूर्ती करण्यात येत आहे.
चौकट
जिल्ह्यात ९८ टक्के जणांना लाभ
जिल्ह्यातील १३ प्रकल्प केंद्रे असून, त्याद्वारे २९३० अंगणवाडी कार्यरत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून आता पूरक आहाराच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. काही ठिकाणी घरपोहोच किट दिले जाते. वाळवा आणि उमदी केंद्रात १०० टक्के काम झाले आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ९८.६६ टक्के लाभार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप करण्यात आले आहे.