ज्योती हिचे आठ वर्षांपूर्वी महादेवाप्पा पट्टणशेट्टीबरोबर लग्न झाले होते. त्याने पहिले लग्न झाले असताना व दोन मुले असूनही ज्योतीशी लग्न केले होते. ज्योतीलाही दोन मुले आहेत. महादेवप्पा यांच्या दोन्ही बायका एकाच कुटुंबात एकत्र रहात होत्या. अनेक दिवसांपासून महादेवाप्पा व दीर मल्लाप्पा यांनी ज्योतीला शेतातील कामासाठी व चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासास कंटाळून ज्योतीने १८ फेब्रुवारी रोजी पेटवून घेतले. जखमी अवस्थेत तिला सांगली येथे उपचारासाठी दाखल केले असता, १९ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला.
याबाबत तिचे वडील धानाप्पा चनप्पा ब्यागेळी (रा. अहिरसंघ, ता. इंडी-कर्नाटक) यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पती महादेवप्पा सिद्राम पट्टणशेट्टी व दीर मल्लाप्पा पट्टणशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.