सांगली : लूटमार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या इसर्डे टोळीतील गुंड हणमंत पंडित इसर्डे (वय २९, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) याने पोलीस कोठडीत फरशीच्या तुकड्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. इसर्डेविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हणमंत इसर्डे व त्याच्या साथीदाराने टिंबर एरियात आंध्र प्रदेशमधून साहित्य घेऊन आलेल्या हरिभाऊ ध्वजराणा नायक (२६, रा. आंध्र प्रदेश) या ट्रक चालकास बेदम मारहाण करून त्याच्याकडील एक हजाराची रोकड व मोबाईल पळवून नेला होता. याप्रकरणी इसर्डेविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्याच्या कोठडीची मुदत संपणार होती. तत्पूर्वी रविवारी रात्री दहा वाजता त्याने कोठडीतील फरशी हाताने फोडली व फरशीच्या एका तुकड्याने हाताची नस कापून घेतली. त्याच्या हातातून रक्त आल्याचे बंदोबस्तास असलेल्या पोलिसाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला बाहेर काढून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याची पुन्हा कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने दुपारी त्याला न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सायंकाळी त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोडण्यात आले. महिन्यापूर्वी त्याचा भाऊ लखन इसर्डे यानेही शिंदे मळ्यात एका दुचाकी स्वारास अडवून एक हजाराची रोकड लंपास केली होती. (प्रतिनिधी)
गुंडाकडून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: April 14, 2015 00:56 IST