इस्लामपूर : नीती आयोगाने सुचवलेली तीन टप्प्यांतील उसाची एफआरपी कदापि मान्य केली जाणार नाही. शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ती एकरकमी मिळाली पाहिजे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी मंगळवारी केली. साखर नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यानी सांगितले.
बळीराजा, अंकुश आणि जय शिवराय या तीन शेतकरी संघटनांनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य सरकारने केलेली ६०:२०:२० अशी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची सूचना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. ती १४ दिवसांत एकरकमी मिळाल्यास शेतकरी विकास सोसायटी, बँक यांचे कर्ज फेडू शकतात. त्यांना व्याजाचा भुर्दंड बसणार नाही.
ते म्हणाले की, तोष्णीवाल समितीने जेवढे अंतर आहे, तेवढीच तोडणी वाहतूक धरण्याची शिफारस केली होती. कारखानदारांनी मात्र सरासरी अंतर काढून हा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला आहे. कायद्यात सुधारणा करून प्रत्येक कारखान्याचे सरकारी लेखापरीक्षकांकडून व्यवहार तपासणी करणे बंधनकारक करायला हवे. या विषयावर आम्ही साखर नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करत आहोत.
यावेळी सदाशिव कुलकर्णी, तात्यासाहेब कोळी (कुंभोज), उत्तम पाटील, गब्बर पाटील (लाटवडे) उपस्थित होते.