सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६मधील तरतुदीनुसार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतराच्या आतच असणे गरजेचे आहे. त्यानुसारच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली, मिरज शहरापासून जवळ त्वरित सुरु करावे, अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील व जिल्हाध्यक्ष ॲड. के. डी. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ कुठे असावे, यासाठी शासनाने नियमावली केली आहे. त्यानुसार तज्ज्ञ समितीने तत्काळ अहवाल तयार करुन विद्यापीठ प्रशासनाला सादर करण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील नेत्यांनी उपकेंद्र कुठे असावे, याबाबत वाद घालण्यापेक्षा ते सांगली, मिरज शहरापासून जवळ असणे गरजेचे आहे. शहराच्या ठिकाणी मुलभूत सुविधा आहेत. यामुळे बाहेरुन येणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांची सोय होणार आहे. म्हणूनच आटपाडी, विटा, तासगाव, इस्लामपूर, जत, शिराळा आदी ठिकाणी उपकेंद्रांची मागणी पूर्णत: चुकीची आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली, मिरज शहरापासून जवळ जागेच्या उपलब्धतेनुसार तत्काळ सुरु करावे. या प्रश्नावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालून प्रश्न सोडविण्याची गरज आहे. विद्यापीठाचे उपकेंद्र कुठे असावे, यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड्. धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीनेही योग्य असा निर्णय तत्काळ घेण्याची गरज आहे, असेही प्रा. पाटील व ॲड्. शिंदे म्हणाले.
चौकट
कवलापूर विमानतळाची जागा योग्य
शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील जागा योग्य आहे. ही जागाही उलपब्ध असून, शहरापासून अगदी जवळ आहे. यामुळे येथे उपकेंद्र सुरु करुन वादावर पडदा टाकण्याची गरज आहे, असेही प्रा. पाटील म्हणाले.