लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र कुपवाड शहरात उभारावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.
राज्यपाल कोश्यारी हे सांगली दौऱ्यावर आले असता शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, कुपवाड शहरातील विस्तारित भागात विविध शैक्षणिक व क्रीडा संकुलासाठी जागा आरक्षित आहे. याठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची निर्मिती करावी. कुपवाड हे मध्यवर्ती ठिकाणी असून, गोरगरीब कष्टकरी, शेतकरी, मजूर, कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय होणार आहे. जत, कवठेमहाकाळ, आटपाडी, विटा, तासगाव, पलूस, कडेगाव तालुक्यातील लोकांना विविध कामांसाठी जवळचा मार्ग म्हणून कुपवाड शहरातून जावे लागत आहे. शासकीय व खासगी तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालये, पदवी, कायदा, परिचारिका महाविद्यालय असे अनेक शैक्षणिक संकुल या शहरानजीक आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. कुपवाड शहरात उपकेंद्र न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, सचिव उमर फारूक कमरी, जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे, जिल्हा प्रवक्ता गौतम लोटे, अशोक लोंढे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, प्रशांत कदम, अनिल मोरे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.