लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊनमुळे गरीब कामगार, मजुरांचा रोजगार हिरावला असताना शिक्षण संस्थांकडून फी व देणगीच्या माध्यमातून लूट सुरू आहे. ती थांबवावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.
प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील गरीब मजूर वर्ग काबाडकष्ट करून मुलांना खडतर परिस्थितीत शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतो. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली आहे.
अशा परिस्थितीत गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारे सक्तीने शैक्षणिक फी अथवा डोनेशन घेऊ नये, अशा सूचना दिलेल्या असतानाही शैक्षणिक संस्थांकडून मोठ्या रकमेची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून करू नये असे लेखी आदेश देण्यात यावेत. तरीही शुल्क घेतल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय कांबळे, युवराज कांबळे, आनंदा गाडे, उमेश लाडगे, विक्रांत सादरे, राजू सय्यद, विक्रांत गायकवाड, आदी उपस्थित होते.