खटाव येथील शाळेत विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फळांचा केक तयार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : खटाव (ता. मिरज ) येथे केकऐवजी फळे कापून विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केंद्रशाळेमध्ये या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम शाळेत नियमितपणे राबविला जातो. मंगळवारी तुषार कांबळे या सातवीच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस केकऐवजी फळे कापून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिक्षक सुनील लांडगे यांनी सांगितले की, बेकरीमधील केकसाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दोनशे ते तीनशे रुपये खर्च करणे शक्य नसते. शिवाय आरोग्यासाठी फळे पोषक असल्याने बेकरीतील केकऐवजी फळांचा केक वापरण्याची संकल्पना पुढे आली. वाढदिवसाचा उत्साह शिगेला पोहोचताना केक तोंडाला फासण्याचे प्रकारही सर्रास चालतात, अशावेळी तो डोळ्यांत जाण्याचा धोका बळावतो. हे टाळण्यासाठी फळांच्या केकची आयडिया पुढे आली.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचा वाढदिवस पैशामुळे अडू नये, त्याचा आनंद हिरावून घेता कामा नये, आर्थिकदृष्ट्या परवडणाराही असावा, तसेच आरोग्यासाठी सुखकर असावा, अशा सकारात्मक विचारांचा संगम तुषारच्या वाढदिवसातून तडीस नेण्यात आला. त्यासाठी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या शेतात उपलब्ध फळे आणली. त्यामध्ये कलिंगड, द्राक्षे, रामफळ, आंबा, चिकू, पेरू, केळी यांचा समावेश होता. त्यांची केकसारखी कलात्मक रचना करण्यात आली. ती कापून वाढदिवस साजरा झाला. फळांचे वाटप मुलांना करण्यात आले. भविष्यातही प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस फळे कापून साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.