मणेराजुरी : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या जुन्या भांडणातून तिघा शाळकरी मित्रांनी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यास चाकूने भाेसकले. हल्ल्यात अक्षय आबासाहेब चव्हाण (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तिघा अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांविराेधात तासगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी मणेराजुरी हायस्कूलपासून काही अंतरावर ही घटना घडली.
अक्षय चव्हाण व शाळेतील अन्य काही विद्यार्थ्यांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू हाेता. शुक्रवारी सकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला. संबंधित तीन विद्यार्थ्यांनी हायस्कूलपासून काही अंतरावर अक्षय चव्हाण यास अडवून पोटामध्ये चाकूने भोसकले. अक्षय गंभीर जखमी झालेला पाहून त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच अक्षयच्या नातेवाइकांनी त्याला खासगी वाहनातून सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे.
तासगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हल्लेखाेरांनी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. याबाबत अविनाश चव्हाण यांनी तासगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.