सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्यातरी होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. घरातून बाहेर पडून त्यांच्याकडून संसर्गाची शक्यता असतानाही नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही त्याचे पालन न करण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत तपासणी करून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींनी घरातच राहून उपचार घेणे आवश्यक आहेत. मात्र, अनेकजण बाहेर फिरत असतात. त्यामुळे महापालिका क्षेत्रात होम क्वारंटाईन असलेल्या प्रत्येक व्यक्तीची घरात जाऊन माहिती घेण्यात येत आहे. नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर गुन्हेे दाखल करण्यात येणार असल्याचेही टिके यांनी सांगितले.