सांगली : मोबाइल तंदुरुस्त असतानाही ते परत करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
राज्यभरात अंगणवाडी सेविकांनी मोबाइल वापसी आंदोलन सुरू केले आहे. मोबाइल नादुरुस्त असणे आणि पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी मराठी भाषेतील ॲप नसणे या कारणास्तव आंदोलन सुरू आहे. आंदोलनाविषयी अग्रवाल यांनी कडक भूमिका अंगिकारली आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात आयुक्तांनी म्हटले आहे की, सेविकांनी जमा केलेले मोबाइल संच नजिकच्या सेवा केंद्रात दुरुस्तीसाठी सोमवारपर्यंत (दि.२०) जमा करावेत. त्यांच्याकडून तत्काळ दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्ती शक्य असलेल्या व कायमच्या निकामी झालेल्या मोबाइलची माहिती आयुक्तालयाला कळवावी. मोबाइल संच चांगले असतानाही नादुरुस्त असल्याचे सांगत परत केलेल्या सेविकांवर कडक कारवाई करावी. दरम्यान, सर्व नादुरुस्त मोबाइल ३० सप्टेंबरअखेर दुरुस्त करून देण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित कंपनीला केली आहे, त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत सेविकांना तंदुरुस्त मोबाइल मिळू शकणार आहेत.