फोटो : २५०८२०२१ गेल ऑम्वेट ०३ : कुटुंबासोबत... डावीकडून गेल ऑम्वेट, इंदुताई पाटणकर, प्राची पाटणकर, डॉ. भारत पाटणकर.
फोटो : २५०८२०२१ गेल ऑम्वेट ०४ : डॉ. गेल ऑम्वेट आणि डॉ. भारत पाटणकर.
फोटो : २५०८२०२१ गेल ऑम्वेट ०५ :गेल ऑम्वेट, डॉ. भारत पाटणकर, प्राची पाटणकर.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : साम्राज्यवादाच्या विरोधातील रक्तात भिनलेली चळवळ घेऊन अमेरिकेतील विदुषी भारतात आली. विचार, आचार आणि अभ्यासाने तिने भारतातील चळवळीला व्यापक बनविले. सामाजिक कार्याचा दीपस्तंभ बनून कार्यकर्ते-अभ्यासकांना दिशा देणाऱ्या बहुआयामी डॉ. गेल ऑम्वेट यांच्या कार्याचा हा आलेख चळवळीच्या इतिहासातले सुवर्णपान बनले आहे.
डॉ. गेल यांचा प्रवास वादळापेक्षा कमी नव्हता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातील मिनियापोलीस शहरात २ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. तेथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेतच त्या अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधातील चळवळीत अग्रभागी होत्या. भारतात आल्यानंतर वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाने त्या प्रभावित झाल्या. महात्मा फुले यांच्या चळवळीवर त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठात प्रबंध सादर केला. त्यांच्यापूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे, तर जगभरातील अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरला. या पुस्तकामुळे महात्मा फुलेंची चळवळ नव्याने अधोरेखित तर झालीच, पण त्यामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशिराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.
डॉ. गेल आणि त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर यांनी निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री व जोतिबांचा वारसा पुढे नेला. अफाट वाचनशक्ती आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल संपूर्ण भारतभर फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळींत पुढाकार घेत सहभागी होत राहिल्या. चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी त्यांनी केली होती. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगणा इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख होत्या.
विविध विद्यापीठांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये त्यांनी संशोधकाची आणि मार्गदर्शकाची जबाबदारी सांभाळली. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर)च्यावतीने ‘भक्त’ या विषयावरही त्यांनी संशोधन केले होते. ‘दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली’ या अंकात व ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रात विविध विषयांवरचे लेख प्रकाशित झाले होते. लेख वाचून वीरप्पन यांनीसुद्धा पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले होते.
डॉ. गेल यांची पंचवीसपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित असून, त्यामध्ये सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, दलित अँड द डेमोक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुव्हमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.
कोट
भारतातील सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविधांगी क्षेत्रात डॉ. आम्वेट यांनी संशोधक, अभ्यासक म्हणून तसेच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी सक्रिय योगदान दिले आहे. समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या या योगदानाची नोंद राहील.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
कोट
गेल ऑम्वेट यांच्या निधनाने आपण अत्यंत प्रतिभावान व्यक्ती गमावली आहे. अमेरिकेतून आलेल्या एका मुलीने भारतीय नागरिकत्व स्वीकारून आयुष्यभर येथील समाजव्यवस्था समजून त्याची नव्याने मांडली केली.
- जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली