शिराळा : मराठा आरक्षणसंदर्भात इतर कोणाचेही नेतृत्व मान्य करणार नसून, ३५ वर्षे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आयुष्य खर्ची घालणाऱ्या विजयसिंह महाडिक यांच्या पाठीशी ताकद उभी करणार असल्याचे मत अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड यांनी व्यक्त केले.
गायकवाड म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा आला की पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे अनेक जण समाजाचे बेगडी प्रेम घेऊन सामोरे येतात. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मराठ्यांचे खरे कैवारी महाडिक हेच आहेत. अखिल भारतीय मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड (सा. सं.), शंभूराजे युवा क्रांती, जिजाऊ ब्रिगेड, मराठा आरक्षण संघर्ष व समन्वय समिती यांची सर्व ताकत महाडिक यांची आहे. समाजासाठी झटणाऱ्या महाडिक यांना उपेक्षा सहन करावी लागली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात त्यांनी संघटन उभे केले आहे. मराठा आरक्षण किती गरजेचे आहे, हे वेळोवेळी पटवून दिले आहे.