लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील एम ब्लॉकसह इतर विविध भागांतील पथदिव्यांचे पोल सडले आहेत. यामुळे अनर्थ घडण्याची शक्यता असून हे सडलेले पोल एमआयडीसी प्रशासनाने त्वरित बदलावेत, अशी मागणी उद्योजक डी.के. चौगुले व बामणोलीचे माजी उपसरपंच अंकुश चव्हाण यांनी केली आहे.
चौगुले व चव्हाण म्हणाले की, कुपवाड एमआयडीसीतील एम ब्लॉकसह इतर विविध भागांत पथदिव्यांचे पोल बसवून अनेक वर्षे झाली आहेत. हे पोल आता तळातून सडलेले आहेत. पोल पडून अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच या भागातील पथदिवे सतत बंद असतात. याबद्दल उद्योजक कायम तक्रार करीत आहेत. तात्पुरती दुरुस्ती केली जाते. पुन्हा हे पथदिवे बंद पडतात.
तसेच एमआयडीसी प्रशासनाने या पथदिव्यांसाठी केलेले वायरिंग जमिनीत न पुरता उघड्यावर ठेवल्याने सतत खराब होऊन पथदिवे बंद पडत असतात. या चुकांचे खापर इतरांवर फोडले जाते. एमआयडीसी प्रशासनाने हे सडलेल्या एम ब्लॉकसह इतर विविध भागांतील पथदिव्यांचे पोल त्वरित बदलावेत. अन्यथा, आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही चौगुले व चव्हाण यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिला आहे.