लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कवठेमंकाळ येथील दुय्यम निबंधक वर्ग १ च्या कार्यालयाचे अधिकारी व मुद्रांक विक्रेत्यांच्या संगनमताने दस्त खरेदीसाठी गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्यात येत आहे. याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, एक दस्त खरेदीसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली जाते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे. फक्त दोनच लोकांना दस्त लेखन करण्याचा अधिकार असताना व बाकीच्यांना मुद्रांक विक्रीचा अधिकार असताना हे लोक जनतेची फसवणूक करत आहेत. गरीब शेतकरी बांधवांना याची माहिती नसते.
त्यामुळे सर्व दस्त खरेदीची शासनाने चौकशी करावी. कवठेमंकाळमध्ये या विक्रेत्याने अलिशान कार्यालय टाकलेले आहे. संगनमताने भ्रष्टाचार होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, ओबीसी नेते रमजान मुल्ला, तालुका अध्यक्ष संपत नरळे, धनाजी जाधव, दादासाहेब नरळे, रवींद्र माने, शहाजी डोंबाळे आदी उपस्थित होते.