लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्तेपासून अनेक वर्षे दूर ठेवल्याने विरोधी संचालकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यातूनच ते बँकेच्या कारभाराबद्दल खोटेनाटे आरोप करीत आहेत. या संचालकांनी बँकेची बदनामी थांबवावी, अन्यथा फौजदारी दावा दाखल करू, असा इशारा बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी दिला.
गुरव म्हणाले की, बँकेवर गेली ११ वर्षे शिक्षक समिती व पुरोगामी सेवा मंडळाची सत्ता आहे. सत्ताधारी संचालकांनी अनेक चांगल्या योजना राबविल्या. कर्जावरील व्याजदर कमी केला. लाभांशात टप्प्याटप्प्याने वाढ केली. काटकसरीने व पारदर्शी कारभार करून बँकेला राज्यात अग्रस्थान मिळवून दिले. पण विरोधी संचालक बँकेचा ताळेबंद न पाहताच आरोप करीत आहेत.
पलूस शाखेव्यतिरिक्त एकही इमारत व जागा खरेदी केलेली नाही. बँकेचे सभासद दुसऱ्या बँकेकडे वळत असल्याचा आरोपही चुकीचा आहे. बँकेच्या कर्ज व ठेवीत वाढ झालेली आहे. उलट विरोधकांनी सत्ता हाती असताना अनेक कर्मचाऱ्यांची भरती करून बँकेवर लाखो रुपयांचा बोजा टाकला आहे. त्यामुळे त्यांनी आधी ताळेबंदाचा अभ्यास करावा, मगच आरोप करावेत. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसन पाटील, बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत, उपाध्यक्ष महादेव माळी उपस्थित होते.