लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्यावतीने ऐनवाडी (ता. खानापूर) येथील अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष तुकाराम नाईक यांना राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ऐनवाडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक व बेवनूर येथील शिवबाराजे फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष तुकाराम नाईक हे गेली ९ वर्ष मुख्याध्यापक व १६ वर्ष अध्यापनाचे काम करत आहेत. शाळा विकास व विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व वर्गखोल्यांमध्ये एलसीडी बसवून अध्यापन कार्यात आधुनिकता आणली. कोरोना काळात शाळा बंद असताना ऑनलाईन अध्यापन, विद्यार्थी गृहभेट व पालक, विद्यार्थ्यांना आरोग्य मार्गदर्शन यासारखे उपक्रम स्वतः सहभागी होऊन राबविले. त्याचबरोबर विद्यालय व शिवबाराजे फाऊंडेशनच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान व सत्कार, कोविड सेंटरला आर्थिक मदत केली.
या सर्व कार्याची दखल घेऊन संतोष नाईक यांना राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा १२ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पार पडला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष नाईक यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, तुकाराम नाईक यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.