इस्लामपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची इस्लामपूर शाखा आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते १५ फेब्रुवारीअखेर राज्यस्तरीय ‘जयंत करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा वृषाली आफळे यांनी दिली.
आफळे म्हणाल्या की, स्पर्धेेचे विसावे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी २८ संघांनी सहभाग नोंदवला आहे. राजारामबापू नाट्यगृहामध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत दररोज नऊ एकांकिकांचे सादरीकरण होईल. स्पर्धेतील विजेत्याला २५ हजार रुपये रोख आणि जयंत करंडक दिला जाईल. द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी २० हजार आणि १५ हजार रुपये रोख पारितोषिके आहेत. तीन एकांकिकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. १५ हजार रुपयांची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.
त्या म्हणाल्या, १३ रोजी नाट्य व चित्रपट अभिनेते सुशांत शेलार (मुंबई) आणि युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. सूरज चौगुले, प्रा. डॉ. संदीप पाटील, डॉ. नीलम शहा उपस्थित होते.
फोटो - जयंत पाटील सिंगल फोटो घ्यावा.