तासगाव : टोप संभापूर ते दिघंची असा कोल्हापूर ते सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा राज्य महामार्ग तासगावमधून गेला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला मंजुरी मिळाली. दिघंची ते आरवडेपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आरवडे ते तासगावपर्यंतचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे महामार्ग पार्किंगचा अड्डा झाला आहे. ठेकेदाराच्या हालगर्जीपणाने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
तासगावपासून आरवडेपर्यंत सुमारे दहा किलोमीटरच्या राज महामार्गच्या रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्ता उखडण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करण्यासाठी एकतर्फी रस्त्याचाच वापर सुरू आहे. काम सुरू केलेल्या रस्त्यावर खडी पसरून ठेवण्यात आली आहे. ही खडी सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर आल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काम कासवगतीने सुरू आहे.
या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. अपघात आणि दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. ठेकेदारावर कारवाई करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
चौकट
राजकीय उदासीनता
तासगाव ते आरवडेपर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आमदारांचा तासगाव प्रवासही याच रस्त्यावरून सुरू असतो. अनेक लोकप्रतिनिधींना शहराशी कनेक्ट होण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, रखडलेले काम तत्काळ मार्गी लागावे, यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे जीवघेण्या रस्त्याला राजकीय उदासीनताही कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
कामाचा दर्जा निकृष्ट
राज्य महामार्गाचे काम संथगतीने सुरू असतानाच, या कामाच्या दर्जाबाबतही खूप तक्रारी आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव घालताना पुरेशी खोली आणि पुरेसा भराव घालण्यात आला नाही. भराव घालण्यासाठी मातीमिश्रित मुरूम वापरण्यात आला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.