सांगली : पेठनाका-सांगली-मिरज हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ एच सांगली शहरातून जातो. यातील सांगली ते मिरज या रस्त्याच्या दर्जोन्नती प्रकल्पाच्या कामास प्राधान्याने मंजुरी मिळावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
आ. गाडगीळ यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी पेठ नाका ते मिरज या राष्ट्रीय महामार्गाबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील उपस्थित होते.
गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने पेठनाका-सांगली-मिरज हा एकूण ५५ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग (क्र. १६६ एच) घोषित केला आहे. त्यापैकी पेठनाका ते सांगली हा ४१ किलोमीटर लांबीचा भाग एक आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण व दर्जोन्नती करण्याचे काम मंत्रालयाने २०२१-२२ च्या वार्षिक आरखड्यामध्ये समाविष्ट केले आहे. या कामाचा प्रकल्प अहवाल राष्ट्रीय महामार्गाच्या प्रादेशिक विभागाने मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळून लवकर सुरू व्हावे.
भाग-२ अंतर्गत सांगली ते मिरज या सुमारे १४ किमीच्या रस्त्याच्या दर्जोन्नतीबाबतच्या कामाचे अद्याप कोणतेही नियोजन शासनस्तरावर झालेले नाही. यासाठी तांत्रिक सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. प्रकल्प अहवाल तातडीने पूर्ण करून कामास मंजुरी द्यावी. सांगली ते मिरज या भाग-२ चेही काम प्राधान्याने करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या कोल्हापूर-सांगली विभागाच्या चौपदरीकरणाचा विकास आराखडा लवकर पूर्ण करावा, २०२१ रोजी कृष्णा नदीला आलेल्या महापुराने सांगली व इनामधामणी गावाला पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गवर पाइपऐवजी बॉक्स कल्व्हर्ट बांधणे गरजेचे आहे.