लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उपक्रमांवर बंधने असली तरी आपत्ती काळातील गरज ओळखून कडेगाव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कडेगाव तालुक्याच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमास हातभार लावला.
कडेगाव येथील राम मंदिर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा संघ चालक डॉ. मकरंद बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. दि. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु लसीकरण झाल्यानंतर ६० दिवस कोणालाही रक्तदान करता येत नाही. त्यामुळे सद्यस्थिती पाहता रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शिबिरास चांगला प्रतिसाद देत ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सांगलीच्या महाराष्ट्र कमांडो फोर्स पथकाद्वारे मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल देऊन शिबिरास मदत केली.
कराड येथील महालक्ष्मी रक्तपेढीने रक्त संकलन केले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कराड जिल्हा सहसंयोजक, अजय मोहिते, कडेगांव तालुका प्रमुख गिरीधर सुतार, सहप्रमुख दिग्विजय देशमुख, तेजस लोखंडे, प्रसाद भस्मे, आदित्य लोखंडे, केदार पवार, रविराज सूर्यवंशी, विवेक मुळीक, संकेत मुळीक, विजय डुबल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : ०९ विटा २
ओळ : कडेगाव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. मकरंद बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजय मोहिते, गिरीधर सुतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.