तासगाव : कुमठे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीने पूर्णवेळ पाच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स नियुक्त केले आहे. ग्रामपंचायतीच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. नागरिकांकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आपत्ती व्यवस्थापन समितीकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. कुमठेसारख्या ग्रामपंचायतीत रुग्णांची संख्या १०० पर्यंत पोहोचली होती.
कोरोनोची साखळी तोडण्यासाठी आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कुमठेचे सरपंच महेश पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनानुसार गावातच विशेष टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाच कर्मचारी पूर्णवेळ गावात कार्यरत आहेत. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे. या टास्क फोर्सचा धसका घेतल्याने कुमठेत शंभर टक्के नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. गावात पूर्णपणे शुकशुकाट आहे.
ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मदतीला आता स्पेशल टास्क फोर्सचे पाठबळ मिळाल्यामुळे गावात लवकरच कोरोनाची साखळी तुटेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोट
कुमठेत कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत होती. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी तासगाव पोलिसांच्या सहकार्याने स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. तेव्हापासून गावात रुग्णसंख्येची वाढ कमी आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- महेश पाटील, सरपंच, कुमठे (ता. तासगाव)