लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोटारसायकलींचे कंपनी नियमानुसार असलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून नियमभंग करणाऱ्या २४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. सांगली वाहतूक शाखेने ही मोहीम उघडत मॉडीफाय सायलेन्सर जप्त करत वाहनधारकांना २६ हजार ५०० रुपयांचा दंडही केला.
सायलेन्सरमध्ये बदल करून इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार सांगली वाहतूक शाखेने शहरातील प्रमुख मार्गावर मोहीम उघडत सायलेन्सरमध्ये बदल करुन मोठ्या आवाजात फिरणाऱ्यांवर कारवाई केली. यात २० बुलेट व चार इतर मोटारसायकलींचा समावेश होता.
मॉडीफाय सायलेन्सरप्रकरणी २४ वाहने जप्त करत ती वाहतूक शाखेच्या आवारात लावण्यात आली होती. कारवाई व दंड भरल्यानंतर पुन्हा त्याच सायलेन्सरचा वापर होऊ नये, यासाठी पोलिसांनी दुचाकी दुरुस्ती करणाऱ्यांना बोलवून मॉडीफाय सायलेन्सर काढून घेत ते जप्त केले. सांगलीत काही महिन्यानंतर पुन्हा एकदा अशी कारवाई करण्यात आल्याने मॉडीफाय सायलेन्सर लावणारे वाहनधारक रस्त्यावरून गायब झाल्याचे चित्र होते.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
‘लोकमत’चा पाठपुरावा
दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करुन त्याचा फटका काढणाऱ्या हौशी वाहनधारकांमुळे इतरांना त्रास सहन करावा लागत होता. ‘इंदोरी फटक्या’च्या आवाजाने रुग्णांसह ज्येष्ठ, लहान मुलांनाही त्रास होत होता. यावर ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त दिले होते. याच पाठपुराव्याची गंभीर दखल घेत अधीक्षक गेडाम यांनी मॉडीफाय सायलेन्सर बसविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.