सांगली : सीमेवर तैनात असलेले सैनिक आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे देशाचे संरक्षण करण्यासाठी खर्ची करतात. त्यामुळे त्यांचा उचित सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत सोळा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग आॅफिसर कर्नल वसंतराव शिंदे यांनी व्यक्त केले. मेळाव्यात माजी सैनिक, वीरमाता आणि वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.भारतीय माजी सैनिक संघाच्यावतीने येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी कर्नल शिंदे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सैनिक संघाचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस होते. भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. कर्नल शिंदे म्हणाले, भारतीय माजी सैनिक संघाने माजी सैनिक, वीरमाता आणि वीर पत्नींचा केलेला सन्मान हा अभिमानास्पद आहे. सैनिक देशाच्या रक्षणासाठी उभा असतो, त्यामुळेच नागरिक सुखाने जगू शकतात, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. कमांडर राजेंद्र माने म्हणाले, माजी सैनिकांच्या काही समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. आपला आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेची भूमिका महत्त्वाची असून, सर्व माजी सैनिकांनी संघटनेला बळ प्राप्त करून द्यावे, असे आवाहन केले.मेळाव्यास एन. एन.पाटील, अॅड. एम. पी. शिंदे, प्रकाश इनामदार, जी. के. शर्मा, वाय. के. शिंदे आदींसह भारतीय माजी सैनिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. वसंतराव शेटके यांनी सूत्रसंचालन केले, तर रमेश चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सांगलीत रविवारी माजी सैनिक संघाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा कर्नल वसंतराव शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सैनिकांचा सन्मान आवश्यक : शिंदे
By admin | Updated: November 9, 2014 23:38 IST