सांगली : कासेगाव, कुंडलसह सहा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांकडे काम करीत असलेल्या ६० कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या चार महिन्यांपासून झालेला नाही. त्यांनी पगारासाठी दि. १ आॅक्टोबरपासून योजनेचे पाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले. पण, निधीची पुरेशी तरतूद न झाल्यामुळे बुधवारी पगार होऊ शकले नाहीत. दोन दिवसात पगाराचे आश्वासन देऊनही कामगार आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे, सहा योजनांवरील ४७ गावांतील पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.जिल्हा परिषद अकरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालवत आहे. त्यापैकी कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, नांद्रे-वसगडे, तुंग-बागणी, कुंडल आणि वाघोली या सहा प्रादेशिक योजनांकडील ६० कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या चार महिन्यांपासून झालेला नाही. सेवानिवृत्त ११ कर्मचाऱ्यांची पेन्शनही दिली नाही. या कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पगाराच्या प्रश्नावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, या मागणीकडे प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे पाणी योजनेकडील ६० कर्मचाऱ्यांनी दि. १ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे सहा योजनांच्या लाभक्षेत्रातील ४७ गावांतील पाणी पुरवठा गुरुवारपासून विस्कळीत होण्याची शक्यता आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी पाणी योजनेकडील कर्मचारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. परंतु, या बैठकीत कामगारांच्या पगाराचा तोडगा निघाला नाही. दोन दिवसात पगार देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन लोखंडे यांनी कर्मचाऱ्यांना दिले. पण, या आश्वासनावर कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नसल्यामुळे त्यांनी नियोजित आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब शेलार या कर्मचाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)
सहा प्रादेशिक योजना आज बंद राहणार
By admin | Updated: October 1, 2015 00:36 IST