खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशानुसार देवदर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. देवाची दैनंदिन विधिवत पूजा कोरोनाचे सर्व नियम अटींचे पालन करून मोजक्याच पुजारी हस्ते होणार आहे. भाविकांनी देवदर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टकडून केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी सिद्धनाथ मंदिर पुन्हा बंद झाल्याने मंदिर परिसरातील हार-फुले, पेढे, नारळ, पूजा साहित्य विक्रेत्यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. गेल्या वर्षभरात सिद्धनाथाचे विविध सोहळे, यात्रा रद्द झाल्याने छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मंदिर परिसरातील नारळ, पेढे, चिरमुरे, मिठाईवाले, हार, फुले, पूजा साहित्य विक्रेत्यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या व्यवसायावरच येथील कुटुंबीयांचे संसार चालत होते. गेल्या वर्षभरापासून मंदिर परिसरातील व्यवसाय अडचणीत आहेत. या व्यावसायिकांना शासनाने मदत करावी, अशी मागणीही येथील छोट्या व्यावसायिकांनी केली आहे.