सांगली : जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीच्या दुरुस्ती कामातील गडबड घोटाळ्याप्रकरणी गणेश आणि सिद्धनाथ मजूर संस्थांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी ५ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरग येथील सिद्धनाथ मजूर सोसायटी व लिंगनूर येथील गणेश सोसायटीने जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीत दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे केली आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान कामे झाली. त्यात आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी ठेवला आहे. दुरुस्ती, रंगकाम, पाणीपुरवठा व स्वच्छतागृहांची दुरुस्ती या कामात घोटाळे झाले आहेत. जीएसटी व रॉयल्टी चुकविली आहे. फरशीच्या किमतीतही बनवाबनवी आहे. यासंदर्भात दोन्ही संस्थांना डिसेेंबरमध्ये नोटिसा काढण्यात आल्या होत्या. त्यावर आतापर्यंत चारवेळी संस्थांनी म्हणणे सादर केले, पण प्रशासनाने ते फेटाळून लावले.
गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यापुढे पुन्हा म्हणणे सादर करण्यात आले. तेदेखील फेटाळण्यात आले. तपशिलासह म्हणणे सादर करण्यासाठी आता ५ मार्चची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने शोधून काढलेले घोटाळे पाहता, या संस्थांची त्यातून सुटका होण्याची शक्यता नाही. संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी निबंधकांकडे शिफारस केली जाण्याची चिन्हे आहेत.
-----------