ताकारी : ऊसदर शेतकऱ्यांचा हक्क आहे. एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. यावर्षी ज्या कारखान्यांनी एफआरपीमधून रक्कम कपात केली, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना रक्कम परत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ग्वाही देऊन, राजारामबापू कारखान्याने बिगर सभासदांना सभासद करून घेण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. प्रतापराव बापूराव मोरे अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुका अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष महावीर पाटील, युवा आघाडीचे संजय बेले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष भास्कर कदम प्रमुख उपस्थित होते.खासदार शेट्टी म्हणाले की, कारखानदार एफआरपीचे तीन तुकडे पाडणार आहेत. तसा ते बेकायदेशीर ठरावही करीत आहेत. आमचा ऊस आणि हक्क यांचा हा कसला न्याय? राजारामबापू कारखान्याने बिगर सभासदांच्या एफआरपी रकमेतून कपात केली. तुम्हाला कारखान्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रक्कम कपात करण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून १४७ रुपये कापून घेतले आहेत.रविकांत तुपकर म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वत:च्या उसाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या १४ वर्षांपासून ऊस परिषदेमार्फत ऊस दर ठरविण्याचा निर्णय घेतला जातो. यावेळी इस्लामपूर बाजार समितीवर शासन नियुक्त संचालकपदी शिवाजीराव मोरे यांनी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रकाश रसाळ यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी अधिक मोरे, सचिन पवार, गणेश शेवाळे, रवींद्र खराडे, प्रताप कदम, धनाजी मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)एकी दाखवा : खोतसदाभाऊ खोत म्हणाले की, एफआरपी एकरकमी देण्यासाठी संघटना सरकारवर दबाव आणेल, पण एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. कारखानदार जसे एक होतात, तसे शेतकऱ्यांनी यापुढे एकी दाखवावी, अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.
बिगर सभासदांना सभासद करून दाखवा
By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST