फोटो ओळी : रायवाडी (ता. कवठेमहंकाळ) येथील तलावात समाधानकारक पाणीसाठी आहे. जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : यंदा पावसाळा अगदी मध्यावर आला तरी कवठेमहांकाळ तालुक्यातील अकरापैकी दोन तलावात अल्प पाणीसाठा आहे. नऊ तलावातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. गतवर्षी दमदार पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले, बंधारे, तलाव तुडुंब भरले होते. त्या तुलनेत यंदा पाऊस नसल्याने बळिराजा चिंतेत आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एकीकडे जोरदार पावसाने हाहाकार माजविला होता; तर दुसरीकडे कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यातील जनतेला मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील नरसिंहगाव (लांडगेवाडी) व दुधेभावी या तलावांमध्ये कमी पाणीसाठा आहे.
गतवर्षी चांगल्या पावसामुळे घाटमाथ्यासह नागज, ढालगाव या कायमस्वरूपी टंचाईग्रस्त असणाऱ्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच रिमझिम पाऊस झाला. हा पावस खरीप पिकांच्या वाढीस चांगला असला तरी जमिनीतील पाणी पातळीबरोबरच तलावातील पाणीसाठ्यात वाढीस उपयुक्त नाही.
तालुक्यातील अकरा तलावांपैकी रायवाडी तलावात पुरेसा पाणीसाठा आहे; तर बसप्पावाडी तलावात निम्मा पाणीसाठा आहे. अन्य तलावांतील पाणीसाठ्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. यामुळे तालुक्यात दमदार पावसाची गरज आहे.