सांगली : कवठेमहांकाळ व नेर्ले (ता. वाळवा) येथील दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन दुकान मालकांचे लक्ष विचलित करून पैसे चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. संजय बाबूराव शिकलगार (वय ४८, रा. हरिपूर रोड, काळीवाट, सांगली) व प्रशांत चंद्रकांत डवरी (३८, रा. भारतनगर, सांगली) अशी संशयितांची नावे असून, दुचाकीसह रोख २५ हजार असा ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीचे पथक सांगलीत गस्तीवर असताना, चोरी केलेल्या पैशाच्या वाटणीवरून दोघांत वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने हरिपूर रोडवर जात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, महिन्यापूर्वी कवठेमहांकाळ येथील एका लाकडाच्या वखारीमधील ड्रॉवर उचकटून त्यातील १४ हजार रुपये चोरले, तर त्याच शहरातील बॉम्बे स्टील या दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन ड्रॉवरमधील ३९ हजार रुपये चाेरले. नेर्ले (ता. वाळवा) येथेही बसस्थानकाजवळ असलेल्या एका दुकानात पाण्याची टाकी दाखल म्हणत मालकाचे लक्ष विचलित करत तेथील २८ हजार १०० रुपये चोरल्याचीही कबुली संशयितांनी दिली.
या दोघांनी अनेक ठिकाणी अशाप्रकारे चोऱ्या केल्या असून, रक्कम कमी असल्याने दुकानांच्या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे या दोघांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र जाधव, सुधीर गोरे, संदीप गुरव, अरुण औताडे, राहुल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.