कडेगाव : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उत्कृष्टता (एक्सलंट कॉन्ट्रिब्युशन टू एज्युकेशन सेक्टर) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
असोसिएशन ऑफ इंडिया - कम्युनिकेशन मल्टिमीडिया ॲॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर (सीएमएआय) या संस्थेच्यावतीने सोळावा राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाईन पार पडला. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम यांना प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक योगदानासाठी ‘एक्सलंट कॉन्ट्रिब्युशन टू एज्युकेशन सेक्टर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सीएमएआय या संस्थेचे मुख्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. तेथे आयोजित कार्यक्रमात भारताचे केंद्रीय शिक्षण दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, आयटीयूचे डेप्युटी जनरल सेक्रेटरी माल्कम जॉन्सन, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, सीबीएसईचे संचालक व मानव संसाधन विकास मंत्रालयाचे अंतरिक्ष जोहरी, एआययू सेक्रेटरी जनरल डॉ. पंकज मित्तल, सीएमएआयचे अध्यक्ष प्रा. एन. के. गोयल आदी या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. आमदार मोहनराव कदम, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. कदम यांचे अभिनंदन केले.
चौकट
४५ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षण सेवेचे फलित
शिक्षण क्षेत्रात ४५ वर्षे रात्रंदिवस काम केले. याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला, याचा मनस्वी आनंद होत आहे. भारती विद्यापीठातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकाने तसेच शिक्षण क्षेत्रातील व समाजातील अनेक व्यक्तींनी माझ्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासासाठी मला मदत केली. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून भारती विद्यापीठाला उच्च शिखरावर घेऊन जाण्यास प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा आहे, असे डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले.