लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात थाळीनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.
केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवर अनुक्रमे २.५० रुपये व ४ रुपये कृषी उपकर लावण्याची घोषणा केली. त्यात पेट्रोल, डिझेलचे दरही भरमसाठ वाढले आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर प्रमुख अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, बाळासाहेब मगदूम, जितेंद्र शहा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी थाळीनाद करीत दरवाढीचा निषेध केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता महागाईच्या खाईत लोटली आहे. दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत. इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर ६० रुपयांचे पेट्रोल १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यात आता कृषी उपकर लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढणार आहे. प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. त्याचा जीएसटीत समावेश केल्यास पेट्रोलचे दर कमी होतील, तसेच सर्वच राज्यात एकच दर राहील. घरगुती गॅसच्या दरातही दोन महिन्यांत १०० रुपये दरवाढ झाली आहे. ही दरवाढही तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
फोटो ओळी :- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, बाळासाहेब मगदूम, जितेंद्र शहा उपस्थित होते.