लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : घरगुती गॅसच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीविरोधात शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी केले. आपला बझार समूहाच्या अध्यक्षा सौ. सुनीतादेवी नाईक, जिल्हा परिषद सदस्या सौ. अश्विनीताई नाईक व सौ. दीपालीताई नाईक प्रमुख उपस्थित होत्या.
येथील अंबामाता मंदिराजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी सतत केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या दरवाढीविरोधात घोषणा दिल्या. गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अन्नधान्य, गोडेतेल यासह महागाईने उच्चांक गाठला आहे. यामध्ये मध्यम, सामान्य, शेतकरी व कष्टकरी करणारा वर्ग भरडला जातोय. केंद्र सरकारने महागाई रोखण्यासाठी पावले उचलावीत. सततच्या गॅस दरवाढीचा निषेध म्हणून येथील पोस्ट कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेण्यांचे (शेणकुटे/गोवऱ्या) पार्सल पाठवण्यात आले. या आंदोलनात नगराध्यक्षा सुनीता निकम, नगरसेविका प्रतिभा पवार, सुनंदा सोनटक्के, सुजाता इंगवले, महिला शिराळा शहरअध्यक्ष वंदना यादव, वैशाली कदम, अर्चना कदम, स्मिता महिंद, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.