सांगली : शामरावनगर परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्नांबाबत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. या परिसरातील शंभरावर नागरिकांनी आयुक्त अजिज कारचे यांना याबाबतचे निवेदन शनिवारी दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शंभर फुटी रस्त्यापासून शामरावनगरकडे जाणाऱ्या दक्षिण-उत्तर रस्त्यापासून अनेक कॉलन्यांना पोटरस्ते आहे. याच भागात आठवडा बाजारही भरतो. मोठ्या प्रमाणावर गुंठेवारी भाग असल्याने वर्षानुवर्षे कर भरूनही याठिकाणचे नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड देत नागरिक जगत आहेत. नागरिकांचा महापालिका प्रशासनाबद्दलचा असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. शंभर फुटीपासून दक्षिण-उत्तर रस्त्यालगतचे ड्रेनेजचे काम त्वरित पूर्ण करावे, परिसरातील शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकवस्तीत रस्त्यांचे डांबरीकरण करावे, खुले भूखंड महापालिकेने ताब्यात घ्यावेत, स्वच्छतेच्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवावे, शंभर फुटी रस्त्यावरील वाहनांची अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशा प्रमुख मागण्या आम्ही करीत आहोत. चार दिवसांमध्ये याबाबत महापालिकेने कार्यवाही सुरू करावी, अन्यथा येथील नागरिक बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संदीप दळवी, बबन माने, शिवाजी जाधव, रामचंद्र गुजर, सचिन पोळ, रेशमा पालजादे, छबुताई जगदाळे, इब्राहिम शेख, सय्यद खलिफा, रमेश वाघमारे आदी शंभरावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. खुले भूखंड ताब्यात घ्या... खुले भूखंड महापालिकेने ताब्यात घ्यावेत, स्वच्छतेच्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवावे, शंभर फुटी रस्त्यावरील वाहनांची अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
शामरावनगर नागरिकांचा उपोषणाचा इशारा
By admin | Updated: November 16, 2014 00:12 IST