संख : प्राथमिक शिक्षक बँकेने शिक्षकांना दोन वर्षांपासून लाभांश वाटप केलेला नाही. तो वाटप करावा. तसेच कोरोना काळात शिक्षक, त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. यामुळे संचालक मंडळाने कोविड कर्ज योजना सुरू करावी, अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, बँकेच्या सभासदांना गेली दोन वर्षे लाभांश दिलाच नाही. २०१९-२० व २०२०-२१ या दोन्ही वर्षांचा लाभांश दहा टक्के प्रमाणे देणे आवश्यक असताना तो वाटप केलेला नाही. सध्या बँकेची स्थिती उत्तम आहे. तेव्हा सभासदांसाठी दोन्ही वर्षांचा लाभांश एकत्र वाटप करावा. तसेच मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात अनेक शिक्षकांना, त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली. या काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिक्षक बँकेने येणाऱ्या सर्वसाधारण सभेत कोविड विशेष कर्ज योजना सुरू करावी. आठ टक्के व्याजदराने दहा लाख रुपये कर्ज द्यावे, अशी मागणी आहे.
यावेळी गुंडा मुंजे, तानाजी टेंगले, भगवान वाघमोडे, मनोहर येऊल, उत्तम लेंगरे, विष्णू ठाकरे, अशोक मुचंडी आदी उपस्थित होते.