सांगली : कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरमधील हाय प्रोफाइल वेश्या अड्ड्याप्रकरणी हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, भाऊ रवींद्र उर्फ रवीअण्णा कोरागा शेट्टी हे दोघे पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. हॉटेल व्यवस्थापक राजेश बाबू यादव (वय २०, हॉटेल रणवीर, कर्नाळ रस्ता), दलाल शिवाजी नारायण गोंधळे उर्फ वाघळे (तासगाव), ग्राहक म्हणून आलेले पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सत्यजीत पंडित यांच्यावर यापूर्वीच कारवाई झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहराबाहेर कर्नाळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये हॉटेल मालक शेट्टीबंधूंनी हाय प्रोफाइल वेश्या अड्डा सुरू केला होता. यासाठी मूळच्या हैदराबाद व बंगालमधील आणि सध्या मुंबईत असलेल्या दोन तरुणींना वेश्या व्यवसायासाठी आणून ठेवले होते. काही दिवसांपासून हॉटेलमध्ये चोरीछुपे प्रकार सुरू होता. हॉटेलमधील व्यवस्थापक राजेश यादव हा शिवाजी गोंधळेकडून ग्राहक आल्यानंतर त्यांना पैसे घेऊन वेश्या पुरवत असे. त्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला होता. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.