सांगली : अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या माधवनगर रस्त्यावरील पंचशीलनगर येथील शशिकांत पावसकर या तरुणाचा खून होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही शहर पोलिसांना कोणतेही धागेदोरे लागत नसल्याने तपास गुंडाळला असल्याचे चित्र आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली पोलीस माहीर असताना या खुनाचे गूढ का उकलले जात नाही, याबद्दल आता उलट-सुलट चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेही दुुर्लक्ष झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी एकाचदिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या. आयटीआय कार्यालयाच्या पिछाडीस पोत्यात फेकून दिलेला सडलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर काही वेळातच पावसकरचा मृतदेह कृष्णा नदीत सापडला होता. दोन्ही खून अनैतिक संबंधातून झाले होते. एका खुनाचा अवघ्या तीन-चार तासात छडा लागला. परंतु पावसकरच्या खुनाची फाईल धूळ खात पडली आहे. बेळंकी (ता. मिरज) येथे दोन महिलांच्या खून प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना याचा छडा लागला. मग पावसकरच्या मारेकऱ्यांचा का शोध लागत नाही? अनैतिक संबंधातून त्याचा खून झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीर केले. खुनाचे कारण स्पष्ट झाले असेल तर, आतापर्यंत मारेकऱ्यांचा सुगावा लागायला हवा होता. पावसकर यास आई, वडील व एक भाऊ आहेत. हे कुटुंब गरीब आहे. मुलाच्या मारेकऱ्यांना पोलिसांना पकडावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र शहर पोलिसांनी धागेदोरे लागत नसल्याने त्यांना संशयित आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आज-ना-उद्या पोलीस छडा लावतील, असा त्यांना विश्वास होता. पण सहा महिने होऊन गेले तरी तपासात कोणतीच प्रगती नसल्याने पोलिसांवरील त्यांचा विश्वास उडाला आहे. आता न्याय कुणाकडे मागायचा? असा त्यांना प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)‘डीबी’ की ‘तडजोडी’ पथक?गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखा आहे. या शाखेत दोन अधिकारी व दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. एखादा अपवाद वगळला तर डीबी शाखेची कोणतीही भरीव कामगिरी नाही. विविध गुन्ह्यातील संशयितांना आणले जाते. त्यांना चोप दिला जातो. मात्र पुढे तडजोड करुन सोडले जात असल्याची चर्चा नेहमी रंगत असते. जुगार अड्ड्यावर छापे टाकूनही त्यांची रेकॉर्डवर कुठेच नोंद केली जात नाही. पावसकर खुनाचा त्यांनी केलेला तपासही संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
शशिकांत पावसकर खुनाचा तपास गुंडाळला
By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST