तासगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी शशिकांत माने, तर स्वाभिमानी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी गुलाबराव यादव यांची, तर युवा आघाडी तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी अकीब मुजावर यांची निवड करण्यात आली.
या निवडी जिल्हाध्यक्ष महेश खराडे व तालुका अध्यक्ष जोतिराम जाधव व दामाजी दुबल यांनी केल्या. बस्तवडे येथे झालेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी आणि महेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तालुक्यात संघटना वाढीसाठी काम करू. गाव तेथे शाखा काढून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करू. तासगाव तालुक्यातील द्राक्ष, बेदाणा, ऊस आणि भाजीपाला उत्पादकांना संघटित करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. शेतकरी संघटित झाल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे त्यांना संघटित करण्यासाठी जिवाचे रान करू, अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी बस्तवडेचे उपसरपंच संदेश पाटील, अशोक खाडे, भुजंग पाटील, महेश जगताप, संदीप शिरोटे, अनिल पाटील, सुरेश पाचिब्रे, बसवेश्वर पावटे, माणिक शिरोटे, आनंद स्वामी, प्रकाश साळुंखे, आदी उपस्थित होते.