लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अरुण दाते कला अकादमी आणि माणिक निर्मित आयोजित पहिल्या जागतिक कथाकथन स्पर्धेत निवेदक, अभिनेता, दिग्दर्शक शशांक लिमये यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या जागतिक कथाकथन स्पर्धेत प्राथमिक फेरीत जगभरातून ४२५ मराठी स्पर्धक सहभागी झाले. त्यातून दुसरी फेरी १२५ स्पर्धकांची झाली. तिसऱ्या फेरीत ६५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि यातून अंतिम फेरीसाठी २० स्पर्धक निवडले गेले. प्रत्येक फेरीसाठी वेगवेगळे विषय दिलेले होते, ज्यावर कथा सांगायची होती. त्यात सांगलीचे शशांक लिमये यांनी ‘नाते’ या विषयावर कथाकथन सादर केले होते. मोठ्या गटात ऋचा तावडे (प्रथम), शशांक लिमये (व्दितीय), दीपश्री भागवत (तृतीय), तर लहान गटात इशिता तावडे (प्रथम), वेदिका चंद्रात्रे (व्दितीय), केंदाती पटवर्धन (तृतीय) यांनी यश मिळवले. या स्पर्धेत स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी, तर प्रमुख आयोजक अतुल दाते आणि स्पर्धा समन्वयक प्रिया जैन यांनी काम पाहिले.