सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. १०८ आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी काढले.
दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य प. पू. १०८ श्री शांतिसागर महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी पार पडली. वीर सेवा दल व समस्त दिगंबर जैन समाज, कोथळी कुप्पनवाडी यांच्यावतीने ऑनलाईन सवांद आयोजित केला होता, अशी माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी सांगितले.
सकाळी १०८ णमोकार महामंत्राचे जाप्य व विश्वशांती प्रार्थना करण्यात आली. शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शांती दीपप्रज्वलन करण्यात आले. शांतिसागर महाराज यांनी त्यांच्याच मुखातून सल्लेखनाच्या २६ व्या दिवशी दिलेला अंतिम उपदेश वीर सेवा दल या फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आला. जन्मभूमी भोज येथून आलेल्या शांतिकलशाचे स्वागत करून धर्मानुरागी सुरेंद्र पिटके यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊन वर्धमानसागर महाराज यांच्या व संघस्थ त्यागी, आर्यिका यांच्या पचांमृत अभिषेक करण्यात आला.
यावेळी वर्धमानसागर महाराज म्हणाले की, शांतिसागर महाराजांनी आपल्या विहारात जल आणि वायू यांचा त्याग केला. पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर पायी विहार करून सर्व अडचणींवर संयम व शांतीच्या मार्गाने मात करून जैन धर्माची पताका देशभर फिरविला. आयुष्यातील २७ वर्षांहून अधिक काळ उपवास करून तप साधना केली. वीर सेवा दल हे गेली ४० वर्षे प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करते ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व सामाजिक कार्य करीत आहे. ही परंपरा त्यांनी कायम ठेवावी.
या वेळी प.पू. १०८ हितेंद्रसागर महाराज, प.पू.स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक महाराज यांचे आशीर्वचन व महामंत्री बाळासाहेब पाटील, महावीर (राजस्थान), एन. जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत डॉ. रावसो कुन्नुरे, प्रास्ताविक भूपाल गिरमल यांनी केले. संयोजन राजू दोड्डण्णावर तर आभार मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी मानले. सूत्रसंचालन आर.बी खोत, अजित भंडे यांनी केले. शांतिकलशाचा मान अजित मडके व जलदकुमार पाटील यांना देण्यात आला. अध्यक्षस्थानी पी.आर. पाटील होते.