कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर भागातील समग्र ऑरगॅनिक ॲन्ड केमिकल प्रा. लि. या खत कंपनीच्या गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख आठ हजार ७२९ रुपयांच्या २८० खतांच्या पोत्यांची चोरी झाली. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
विनोद सुभाष पवार (रा. मणेराजुरी ता. तासगाव) यांची बामणोली (दत्तनगर) येथे समग्र ऑरगॅनिक अँड केमिकल या नावाची खत कंपनी आहे. त्यांनी ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत कंपनी बंद ठेवली होती. या कालावधीत चोरट्यांनी कंपनीच्या जवळच असलेल्या खत गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गोडाऊनमधील १ किलो, २५ किलो, ३५ किलोच्या महागड्या २८० खतांच्या पोत्याची चोरी केली. त्याची अंदाजे किंमत सात लाख आठ हजार ७२९ रुपये आहे.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीचे सुपरवायझर कामावर आल्यावर त्यांना गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी तातडीने ही माहिती मालक पवार यांना दिली. पवार यांनी तातडीने कंपनीच्या गोडाऊनमध्ये येऊन पाहणी केली असता गोडाऊनमध्ये खतांच्या पोत्यांची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे तपास करीत आहेत.