सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या दोन अधिकाऱ्यांना घोटाळ्याच्या चौकशीतून वगळण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतल्यामुळे जिल्हा बॅँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच न्यायाने या घोटाळ्यात अडकलेल्या ११ पैकी ७ कर्मचारी वगळले जाऊ शकतात. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या १७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी कलम ८८ नुसार चौकशी सुरू असतानाच, सहकार विभागाने यातील तत्कालीन अधिकारी माधव गोगटे व मनोहर कावेरी यांना घोटाळ्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. एका न्यायालयीन निर्णयाचा दाखला देताना सहकार विभागाने, संबंधित अधिकारी निर्णय प्रक्रियेत नसल्याने त्यांना घोटाळ्यातून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अन्य ७१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चौकशी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणातून वगळण्याची मागणी केली आहे. हाच निर्णय जिल्हा बॅँकेच्या सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू होऊ शकतो. त्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार विभागाकडे अपील दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. वास्तविक यापूर्वी याच मुद्द्यावर काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले होते. वसंतदादा बॅँकेच्या निर्णयातून आता जिल्हा बॅँकेच्या संचालकांना दिलासा मिळाला आहे. वसंतदादा बॅँकेच्या निर्णय प्रक्रियेत संचालकांसोबत व्यवस्थापकीय संचालकही असतात. जिल्हा बॅँकेच्या निर्णय प्रक्रियेत व्यवस्थापकीय संचालकांबरोबरच दोन व्यवस्थापक, उपव्यवस्थापक यांचाही समावेश असतो. (प्रतिनिधी)तयारी सुरू : कर्मचारी मागणी करणारवसंतदादा बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना घोटाळ्याच्या चौकशीतून वगळण्याच्या सहकार विभागाच्या निर्णयानंतर, आता जिल्हा बँकेच्या सव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अडकलेल्या कर्मचाऱ्यांनीही असेच अपील करण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच याबाबतची मागणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होण्याची चिन्हे आहेत. घोटाळ्यात अडकलेले बँकेचे कर्मचारीसव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व्ही. आर. चव्हाण, जे. डब्ल्यू. कडू, उपव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, प्रकल्प क्षेत्र अधिकारी यु. एम. मोहिते, एल. डी. पाटील, व्ही. के. सूर्यवंशी, एस. के. पाटील, वरिष्ठ अधिकारी एन. के. साळुंखे, यु. एम. शेटे, एस. बी. सावंत, निरीक्षक एस. एन. सावंत यांचा समावेश आहे.
घोटाळ्यातून सात कर्मचारी सुटणार!
By admin | Updated: July 8, 2016 01:02 IST