लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : प्रत्येक गावात चालू केलेल्या विलगीकरण केंद्रामध्ये मूलभूत सुविधा ग्रामपंचायतींनीच पंधराव्या वित्त आयोगातून पुरवाव्यात, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.
पलूस येथे कोरोना आढावा बैठकीत मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते, उपसभापती अरुण पवार, तहसीलदार निवास ढाणे, डॉ. रागिणी पवार, डॉ. अधिक पाटील, गटनेते सुहास पुदाले, आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन त्या-त्या गावात प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी ग्रामपंचायत आणि दक्षता समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयात कोराेनाचे उपचार घेतले जात असून त्या रुग्णालय प्रशासनाने शासकीय यंत्रणेला त्याची माहिती देण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण बाहेर फिरत असून ही गंभीर बाब आहे. याकडे खासगी रुग्णालय आणि ग्रामपंचायत दक्षता समितीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
पलूस तालुक्यात कोरोना चाचणी का कमी घेतली जात आहे, अशी विचारणा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेला केली. तसेच आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी दिली.
चौकट
रुग्णांना उपचार न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई
अत्यवस्थ रुग्णांना जर कोणी रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले नाही तर त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल. कोणत्याही रुग्णालयाने व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची अडवणूक करू नये. जर एखादे रुग्णालय उपचारासाठी रुग्णाला दाखल करून घेत नसेल तर त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी. तत्काळ त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.