सांगली : महापालिकेच्या २३ शाळांमध्ये यंदापासून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. महापालिका शाळेतील पटही १२१ने वाढल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी सांगितले.
महापालिका शिक्षण विभागाच्या ५० शाळा आहेत. त्यात मराठी माध्यमाच्या ३८, उर्दु १०, व कन्नड माध्यमाच्या दोन शाळांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून महापालिका शाळेची पटसंख्या वाढू लागली आहे. काही शाळांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजीटल क्लासरुमही सुरू करण्यात आले आहे. रंगरंगोटी, प्राथमिक सुविधा, पिण्याचे पाणी व इतर अनेक गोष्टीवर प्रशासनाने लक्ष दिले. गेली वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ज्या मुलांकडे मोबाईल सुविधा नाही, अशा मुलांच्या घरी जावून शिक्षण दिले जात आहे.
याबाबत कापडणीस म्हणाले की, गतवर्षी शाळांचा पट ५३९० होता. यंदा त्यात १२१ ने वाढ झाली आहे. शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेतले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मागील वर्षी २७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा त्यात १४७ ने वाढ झाली आहे. शिक्षण विभागाच्यावतीने कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. ऑफलाईन शिक्षणामधील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक गृहभेटी देण्यात आल्या. ई लर्निंग, बोर्ड परिक्षेच्या धर्तीवर तीन सराव चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मॉडेल स्कूल निर्मीती करुन सेमी इंग्लीशचा पर्याय उपलब्ध करुन दिला. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना आकर्षक मोफत गणवेश देण्यात आला. प्रायोगिक स्वरुपात विद्यार्थ्यांना टॅब दिले.