विटा : वैद्यकीय प्रयोगशाळेचे नियंत्रण व नियमन करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीवर विटा येथील सुप्रसिद्ध डॉ. गिरीश शरनाथे यांची अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली.
विटा येथे गेली तीन तपे म्हणजे ३६ वर्षे वैद्यकीय लॅबोरेटरीज क्षेत्रात डॉ. शरनाथे यांचे योगदान, अविरत सेवा, विश्वासाहर्ता लक्षात घेता त्यांची ही निवड करण्यात आली आहे. ॲक्लाप व एसीबीम संघटनेचे सर्व सदस्य यांची साथ, पाठबळ आणि सहकार्याने डॉ. शरनाथे यांना ही संधी मिळाली आहे. याशिवाय सिंधुदुर्गचे प्रशांत गुळेकर, नागपूरचे अजय सोनी, नाशिकचे जयंत बर्वे, अहमदनगरचे कुमार पाटील यांचीही या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मेडिकल लॅबोरेटरीज क्षेत्रात आता असणारी गोंधळाची स्थिती पाहता महाराष्ट्रात सुसूत्रीत नियमावलीची गरज आहे. आम्ही सर्व अशासकीय सदस्य आमच्या अनुभवाचा, प्रचलित कायद्याचा पुरेपूर अभ्यास करून सर्व शासकीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे तयार करून कायद्यांतर्गत आदर्श परिपूर्ण नियमावली तयार करू याची मला खात्री आहे, अशी माहिती डॉ. शरनाथे यांनी या निवडीनंतर पत्रकारांना दिली. या निवडीबद्दल डॉ. शरनाथे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो :- डॉ. गिरीश शरनाथे, विटा.