शिराळा : कापरी ( ता.शिराळा) गावची सोयाबीन पीक प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी निवड झाली आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत व श्री जनाईदेवी शेतकरी बचत गट कापरी यांच्या माध्यमातून गावामध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत येथील २५ शेतकऱ्यांची निवड केली असून, प्रत्येक शेतकरी एक एकर याप्रमाणे २५ एकर क्षेत्रावर सोयाबीन पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे.
शेतकऱ्यांना मशागतीपासून पीक काढणीपर्यंत सखोल व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना फुले संगम या सुधारित वाणाचे सोयाबीन बियाणे व बीजप्रक्रिया निविष्टा यांचे मोफत वाटप करण्यात आले, तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणी पेरणी व टोकण पद्धतींचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी जी.एस.पाटील, मंडल कृषी अधिकारी एस.डी. घागरे, कृषी पर्यवेक्षक जे.के. खोत, सहायक कृषी अधिकारी एस.एन.अजेटराव, बचत गटाचे अध्यक्ष अमोल पाटील, सचिव प्रसाद पाटील, सदस्य व लाभार्थी शेतकरी उपस्थितीत होते.