सांगली : शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील माध्यमिक शिक्षक सोमवारी (दि. ५) काळ्या फिती लावून काम करणार आहेत. शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी ही माहिती दिली.
राज्यात २००५ पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व भविष्यनिर्वाह निधी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, कोरोनाग्रस्तांना विशेष रजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करावी, अघोषित शाळा व तुकड्यांना निधीसह अनुदानास पात्र जाहीर करावे, अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण द्यावे, २००३ पासूनच्या अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता द्यावी, विशेष शिक्षकांना नियमित व थकीत वेतन द्यावे, त्यांचे समायोजन करावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रद्द करू नयेत, ग्रंथपालांसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशैक्षणिक कामांतून मुक्तता करावी, कॅशलेस विमा योजना लागू करावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.
निवेदनावर नागरगोजे यांच्यासह बजरंग शिंदे, विजय माने, रमेश कोष्टी, बाळासाहेब चोपडे आदींच्या सह्या आहेत.