सांगली : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली तरी जिल्ह्यात मंगळवारी शाळा सुरू झाल्या नाहीत. प्रशासन व शाळा व्यवस्थापनाने कोरोनाचा अंदाज घेऊनच वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या गावात कोरोनाबाधित नसतील, तेथे वर्ग सुरू करता येतील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे तशी स्थिती जिल्ह्यात कुठेच नाही. महापालिका क्षेत्रासह सर्व नगरपरिषदांच्या क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त आहे. विटा, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, पलसू, मिरज, सांगली आदी सर्वच शहरांत कोरोनाबाधितांची संख्या कायम आहे. त्यामुळे तेथे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव आपोआपच निकाली निघाला आहे. ग्रामीण भागातील मोठ्या गावांतही सरासरी पन्नासपर्यंत सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे तेथील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये मंगळवारी बंदच राहिली. हजार-दोन हजार लोकवस्तीच्या छोट्या गावांत रुग्णसंख्या कमी आहे, मात्र, तेथे दहावी-बारावीचे वर्ग नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
वर्ग सुरू करण्यासंदर्भातील निर्णय कोरोना दक्षता समित्यांनी घ्यायचा आहे तसा ठराव करायचा आहे. तथापि, जिल्ह्यात कुठेच १०० टक्के सुरक्षित स्थिती नाही. संसर्ग थांबला असला तरी सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आलेली नाही, त्यामुळे शासनाची परवानगी निरर्थक ठरली. येत्या तीन-चार दिवसांत टप्प्या-टप्प्यांने काही गावांत शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
कोट
कोरोनास्थितीचा अंदाज घेऊन वर्ग सुरू करायचे आहेत. ग्रामदक्षता समित्यांनीही निर्णय घ्यायचा आहे. मंगळवारी सर्वत्र शाळा सुरू झाल्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत मिळालेला नव्हता. शहरी भागातही शाळा बंद राहिल्या.
- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, सांगली