विटा : विटा येथील नेवरी नाक्यावर असलेल्या गुळभेंडीच्या झाडाच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. या झाडाच्या फांद्यांवर दुसऱ्यांदा कुऱ्हाड चालविण्यात आल्याने नागरिकांत संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने लावलेल्या हाय मास्कच्या प्रकाशासाठी झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, पालिकेने नेवरी रस्त्यावरील क्रांतिसिंह शैक्षणिक संकुलाच्या कंपाऊंडलगतच्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश दिले असताना, नेवरी नाक्यावरील एका मोठ्या इमारतीजवळच्या झाडाच्या फांद्या का तोडल्या गेल्या? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विटा येथील नेवरी नाक्यावर नेवरीकडे जाताना उजव्या बाजूला एका मोठ्या इमारतीच्या बाजूला गुळभेंडीचे मोठे झाड आहे. या झाडाच्या फांद्या गेल्यावर्षी उन्हाळ्यात विनापरवाना तोडण्यात आल्या होत्या. त्या फांद्या रातोरात गायबही झाल्या. त्यानंतर वर्ष ते दीड वर्षानंतर या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नेवरी नाका चौकाची शोभा वाढली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने नेवरी नाक्यावर क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ हाय मास्क दिवा उभारला आहे. या हाय मास्कचा प्रकाश नेवरी रस्त्याकडे जात नसल्याने पालिका प्रशासनाने क्रांतिसिंह नाना पाटील संकुलाच्या कंपाऊंडभोवती असणाऱ्या पिंपरणीच्या झाडाच्या फांद्या तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज, गुरूवारी दुपारी हे काम सुरू झाले. परंतु, प्रशासनाने सांगितलेल्या झाडाच्या फांद्यांची तोड न करता, चौकातील गुळभेंडीच्या झाडाच्या फांद्यांची तोडणी करण्यात आली. त्यामुळे हाय मास्कच्या उजेडासाठी, की अन्य दुसऱ्या कारणांसाठी या झाडाच्या फांद्यांची दुसऱ्यांदा कत्तल करण्यात आली, याबाबत शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून नागरिकांतून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (वार्ताहर)संबंधित प्रकाराची चौकशी करणारविटा पालिकेने नेवरी नाक्यावर हाय मास्कची उभारणी केली आहे. त्याचा प्रकाश नेवरी रस्त्यावर जात नसल्याने क्रांतिसिंह नाना पाटील संकुलाच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाच्या फांद्या तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परंतु, त्याठिकाणी नेवरी नाक्यावरील मोठ्या इमारतीजवळ गुळभेंडीच्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या असतील, तर त्याची चौकशी करू, असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. गौडबंगाल काय?पालिकेने नेवरी रस्त्यावरील क्रांतिसिंह शैक्षणिक संकुलाच्या कंपाऊंडलगतच्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश दिले असताना, नेवरी नाक्यावरील एका मोठ्या इमारतीजवळच्या झाडाच्या फांद्या का तोडल्या गेल्या? यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याची चर्चा विटा शहरात सुरू आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने मौन पाळले आहे.
विट्यात झाडाच्या फांद्यांची दुसऱ्यांदा कत्तल
By admin | Updated: December 26, 2014 00:51 IST